निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध!
गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या !
फॅशिस्ट सरकार पुरस्कृत गुंडशक्तीला सडेतोड उत्तर देण्याची तयारी करा!
आज 9 फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये “निर्भय बनो” या अभियानातर्फे आयोजित सभेकरिता आलेल्या पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांतर्फे हल्ला करण्यात आला. “सभा उधळून लावू” अशी धमकी शहर भाजप नेत्यांनी अगोदरच दिलेली होती, आणि निखिल वागळे यांच्याविरोधात पोलिसांच्या पूर्ण सहकार्याने बेकायदेशीर गुन्हेही दाखल केले होते. अशामध्ये सभेच्या ठिकाणी येत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. प्रभात रोड पासून ते दांडेकर पूलापर्यंत गाडीवर अंडी आणि दगड फेकले गेल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. सभेच्या ठिकाणी सुद्धा मोठा जमाव जमवून सभा विस्कळीत करण्याचा प्रयत्न झाला आहे.
जाहीर करून हे हल्ले झाले आहेत आणि हे फक्त पोलिस यंत्रणा व राज्य सरकारचे अपयश नाही, तर राज्य सरकार सोबत संगनमताने झाले आहे, असे म्हणण्यास स्पष्ट वाव आहे. धमकी देणारे शहर पदाधिकारी, महत्त्वाचे कार्यकर्ते, जमलेले कार्यकर्ते यांच्यावर कोणतीही गंभीर प्रतिबंधक कारवाई राज्य शासनाने केली नाही. तसे तर जनाधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना आज शांततामय आंदोलन करण्याचा अधिकार सुद्धा नाकारला जात आहे, पुणे विद्यापीठातील हल्याविरोधात आंदोलनांना सुद्धा आडकाठी केली जात आहे, आणि दुसरीकडे मात्र संघ परिवाराच्या गुंड शक्तिंना जाहीररित्या हल्ले करण्याची सूट दिली जात आहे.
गृहमंत्री फडणवीस यांचे हे फक्त अपयश नाही, तर त्यांच्या सहमती शिवाय हे कसे होत आहे, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
आज भांडवलदार वर्गाचे आंतरिक आर्थिक-राजकीय संकट तीव्र होत असताना, भांडवलदार वर्गाच्याच इतर नेत्यांचे दमन सुद्धा करण्याकडे तो जात आहे, आणि ईडी-सीबीआय सारख्या यंत्रणा वापरून एकाधिकारी फॅशिस्ट राजवटीला मजबूत केले जात आहे. “निर्भय बनो” सारख्या भांडवली/निम्न-भांडवली विचारांच्या कार्यक्रमांचे, आयोजकांच्या लोकशाही अधिकारांचे दमन केले जाते, तेव्हा अशा लोकशाही-नागरी अधिकारांच्या हननाचा फटका सर्वाधिक कामगार वर्गालाच बसत असतो, कारण अशाप्रकारे त्याच्याही अधिकारांवर हल्ला होत असतो. तेव्हा या अधिकारांच्या होणाऱ्या कोणत्याही हननाविरोधात बोलणे हे कामगार-कष्टकरी वर्गाचे कर्तव्य आहे .
या घटनेनंतर उदारवादी भ्रम मनात बाळगणाऱ्या संवेदनशील युवक-युवतींनी, कामगार-कष्टकऱ्यांनी सुद्धा फॅशिझमच्या खऱ्या चरित्रावर विचार केला पाहिजे, आणि सर्वधर्मसमभावाच्या नकली धर्मनिरपेक्षतेचे राग आळवणे बंद करून, तकलादू लोकशाही-नागरी संविधानिक अधिकारांच्या भरवशावर न बसता, आपली रस्त्यावरील शक्ती मजबूत करत फॅशिस्ट गुंडांना सडेतोड उत्तर देण्याची तयारी केली पाहिजे.
आम्ही या फॅशिस्ट सरकारद्वारे पुरस्कृत हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहोत, आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करत आहोत.
भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI)
