Civil RightsDemocratic Rightsनागरी आणि लोकशाही हक्क

पुणे जिल्ह्यातील मंचर येथील पत्रकार स्नेहा बर्वे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध !

पत्रकार स्नेहा बर्वे यांच्यावर हल्ला करणाऱ्या पांडुरंग मोर्डे आणि संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !  मुख्यमंत्री राजीनामा द्या!

मंचर येथील समर्थ भारत न्युजच्या पत्रकार स्नेहा बर्वे निघोटवाडी गावातील ओढ्याच्या अतिक्रमणाची बातमी करायला गेल्या असताना त्यांच्यावर तेथील व्यावसायिक पांडुरंग मोर्डे यांनी लाकडी काठीने क्रूर हल्ला केला. समाज माध्यमांवर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली. 4 जुलै रोजी स्नेहा बर्वे ओढ्यावर अतिक्रमण करून बांधल्या जात असलेल्या शेडचे रिपोर्टिंग करण्यासाठी तिथे गेल्या असताना त्यांनी या बेकायदा बांधकामाविरोधात प्रश्न उपस्थित केले. पूरजन्य परिस्थिती उद्भवल्यास ह्या अतिक्रमणामुळे ओढ्याचे पाणी बाजार परिसरात शिरून धोका निर्माण होईल असे त्यांनी सांगितले.

याविषयी त्यांनी शेडचे मालक पांडुरंग यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पत्रकाराला धुडकावून लावले. परंतु नंतरही स्नेहा यांनी रिपोर्टिंग सुरूच ठेवली आणि प्रशासनावर आणि त्या व्यवसायिकावर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर अचानक पांडुरंग मोर्डे याने स्नेहा यांच्यावर लाकडी काठीने क्रूर मारहाण केली. सोबतच याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या कॅमेरामॅनला सुद्धा मारहाण करण्यात आली. या जबर मारहाणीत स्नेहा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या लोकांना सुद्धा मारहाण करण्यात आली व एकाच्या हाताला गंभीर फॅक्चर झाले.

भाजप सत्तेत आल्यानंतर जनतेच्या बाजूच्या बातमी देणाऱ्या पत्रकारांवर, आणि जनपक्षधर कार्यकर्त्यांवरचे हल्ले सतत वाढले आहेत. ठेकेदार, बिल्डर, व्यवसायिक भ्रष्टाचाराची, अतिक्रमणाची बातमी करणाऱ्या पत्रकारांना धमक्या देतात, जीवघेणे हल्ले करतात आणि हत्या सुद्धा करतात, आणि यांना हिंमत येत आहे कारण भाजप सरकार बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण असो वा पुण्यासारख्या ठिकाणी चंद्रकांत पाटलांसारखे नेते गुंडांसोबत फोटो काढताना असो, गुंडांच्या मागे उभी राहिल्याचे दिसले आहे.

देशस्तरावर सुद्धा हे दिसून येत आहे. काहीच दिवसांपूर्वी जानेवारी महिन्यात रोड बांधकामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची बातमी करणारे छत्तीसगडमधील एक पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा निघृण खून करून त्यांचा मृतदेह सेप्टिक टँकच्या काँक्रीट मध्ये पुरण्यात आला होता. काश्मिरमध्ये राकेश शर्मांवर हल्ला, आसाममध्ये मधुरिया सैकियांवर हल्ला, महाराष्ट्रात निखिल वागळेंवर हल्ला ही भाजप-संघ परिवाराने पत्रकारांवर केलेल्या हल्ल्यांची थोडीशी उदाहरणे आहेत.

बेकायदा बांधकामे करणे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणे, अतिक्रमण करणे, सरकारी किंवा एखाद्याच्या मालकीची जागा गुंडांद्वारे ताब्यात घेऊन बांधकामे करणे, निविदा मिळवण्यासाठी लाच देणे इत्यादी बेकायदा व गुंड कारवायांद्वारे स्वतःचे साम्राज्य उभे करणारे हे मालक लोक कशाप्रकारे सर्वसामान्य जनतेला लुटतात आणि गब्बर होतात हे आपल्याला माहीत आहे. भांडवली राजकारणात आणि विविध भांडवली पक्षांमध्ये अशा लोकांना चांगलाच मान मिळतो कारण हीच लोकं ह्या पक्षांना निधी पुरवठा करतात. ह्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणाऱ्या जनतेला व पत्रकारांना नेहमीच यांच्या गुंडगिरीचा सामना करावा लागतो.

आम्ही सर्व जनपक्षधर पत्रकारांना आवाहन करत आहोत की त्यांनी निर्भिडपणे जनतेची बाजू मांडण्याचे काम सुरूच ठेवावे आणि आम्ही निश्चितपणे त्यांच्या लढाईत सोबत आहोत.

रोज वाढत्या हल्ल्यांमधून दिसून येत आहे की भाजपच्या नेतृत्वातील फडणवीस-शिंदे-अजित पवार सरकार जनतेचे रक्षण करण्यात अपयशी ठरत आहे. हेच सरकार ‘जन सुरक्षे’च्या नावाखाली मात्र पत्रकार, कार्यकर्ते यांना दाबणारा कायदा घेऊन आले आहे.

तेव्हा जनतेने या सरकारचे खरे लोकशाही विरोधी चरित्र ओळखले पाहिजे!

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) मागणी करतो की,

1. ह्या प्रकरणातील सर्व आरोपीना तत्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी.

2. धनदांडगे, आणि सर्व बड्या बिल्डरांच्या बेकायदा बांधकामांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी.

3. जनतेच्या बाजूने पत्रकारिता करून भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात कठोर कायदा करण्यात यावा.

4. वाढत्या गुंडगिरीची जबाबदारी घेत गृहमंत्री-मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा!