धर्माध आणि अंधराष्ट्रवादाचे राजकारण हाणून पाडा ! बुलडोझर राज मुर्दाबाद! मालवण मधील पीडित परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे !
मढीमध्ये व्यवसायाचे स्वातंत्र्य बहाल झालेच पाहिजे !
कामगार कष्टकऱ्यांची वर्गीय एकजूट जिंदाबाद !
24 फेब्रुवारी 2025 रोजी मालवण मधील एका भंगार दुकानावर मालवण नगर परिषदेच्या प्रशासनाकडून कुठल्याही नोटीसविना बुलडोझर चढवत ते ध्वस्त करण्यात आले व त्याचे मालक असणाऱ्या एका मुस्लिम परिवाराला अटक करण्यात आली आहे. त्या परिवारावर भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान “देश विरोधी” नारे लावण्याच्या आरोप करत ही कारवाई केली गेल्याचे सागितले गेले. त्याचवेळी 26 फेब्रुवारी रोजी मढी, अहिल्यानगर येथे मुस्लिम व्यापाऱ्यांवर कानिफनाथ यात्रेदरम्यान व्यापार करण्यावर बंदीची घोषणा स्थानिक ग्रामपंचायतीने केली आहे. या दोन्ही घटनांचा कामगार-कष्टकरी वर्गाने निषेध केला पाहिजे.
मालवणमध्ये रविवारी संध्याकाळी भारत पाकिस्तान मॅचदरम्यान विश्व हिंदू परिषदेच्या एका स्वघोषित कार्यकर्त्याने या परिवारामधील एका लहान मुलाने ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावल्याचे सांगून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण केले. त्यानंतर या परिवारामध्ये आणि तिथल्या इतर स्थानिकांमध्ये वाद झाले आणि अखेरीस पोलिसांकडून या कुटुंबातील सदस्यांना अटक करण्यात आली. दोन समूहांमध्ये शत्रूता वाढवणे व राष्ट्रीय एकतेला धोका पोहोचवण्याचे आरोप करत ही अटक झाली आहे. त्यानंतर कुडाळ मधील शिवसेना-शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी मागणी करताच स्थानिक पोलिसांनी व प्रशासनाने या कुटुंबाचे दुकान बुलडोझरने उध्वस्त करण्याचे काम केले आहे.
अशा घटना खोट्या असल्याचे अगोदरही सिद्ध झाले आहे. 2017 मध्ये मध्यप्रदेश मध्ये 17 मुस्लिम युवकांना भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान ‘पाकिस्तान जिंदाबाद’ चे नारे लावण्याच्या खोट्या आरोपाखाली सहा वर्ष कैद केले गेले होते. नंतर हे आरोप खोटे असल्याचे कोर्टात सिद्ध झाले होते. त्या मुलाने तसे नारे दिले होते का, आणि त्याच्या कुटुंबाची त्यात काय भुमिका होती, आणि जर तसे झाले असेल तर त्याच्या बेकायदेशीरपणाचा प्रश्न न्यायालये ठरवणार की प्रशासन की भाजपचे नेते, आणि त्यापुढेही जाऊन यामुळे घर किंवा व्यवसायाची जागा बुलडोझरने उद्ध्वस्त कशी केली जाऊ शकते, असे सर्व प्रश्न बाजूला पडले आहेत. यावर विचार न करणाऱ्या सर्व कामगार-कष्टकरी कामकरी जनतेने हा इशारा ध्यानात घ्यावा की उद्या हे बेकायदेशीर बुलडोझर कोणत्याही कारणाने आपल्या घरांवर फिरणार आहेत!
नोव्हेंबर 2024 मध्ये भाजप-संघाच्या राजवटीपुढे झुकणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या बेलगाम दडशाहीला लाजून बुलडोझर राजच्या विरोधात निकाल दिला होता, परंतु आता प्रशासन त्यालाही जुमानत नाही हे स्पष्ट दिसत आहे.
प्रचंड खाजगीकरण, कंत्राटीकरण, जनतेच्या संपत्तीची भांडवलदारांना कवडीमोल भावाने विक्री, भ्रष्टाचार, यांचे कहर करत या देशातील टाटा-बिर्ला-अंबानी-अडानी सारख्या बड्या भांडवलदारांची आणि संपूर्ण भांडवलदार वर्गाची हिते जपण्यासाठी फॅशिस्ट भाजप आणि आर.एस.एस. ने देशात जनतेच्या मनात मुस्लिमांच्या रूपात एक खोटा शत्रू उभा करण्याचे काम केले आहे. याच बडया भांडवलदारांची टीव्ही वर्तमानपत्रांसारखी प्रसार माध्यमे आणि जमिनीवरील फॅशिस्ट संघटनांच्या कामाद्वारे संघ-भाजप जनतेमध्ये धर्माच्या नावावर विष कालवण्याचे काम निरंतरतेने करत आले आहे. याच धर्मांधतेच्या आणि अंध राष्ट्रवादाच्या राजकारणांसाठी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचाही पुरेपूर वापर वर्षानुवर्ष केला आहे. देशात सुरू असलेल्या आर्थिक संकटाच्या काळात महागाई, बेरोजगारी, गरिबी अशा मुद्द्यांनी प्रचंड त्रस्त असलेल्या जनतेला त्यांच्या खऱ्या मागण्यांपासून दूर ठेवण्यासाठी फॅशिस्ट राजकारण नेहमीच एक खोटा शत्रू उभा करते. महाराष्ट्रातही संघ-भाजपने हे राजकारण तळागाळात पोहोचवण्याचे काम केले आहे. गेल्या महाराष्ट्र विधानसभेत स्वतःच्या राजकीय हितांसाठी ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हे तो सेफ है’ सारखे नारे देऊन भाजप-महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रातील जनतेमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाला गती दिली आहे. वरील घटनेचा वापरही याच राजकारणाला बळ देण्यासाठी केला जात आहे. जर देशात गेली 10 वर्षे सर्वत्र “हिंदू सरकार” आहे तर अजूनही देशात “हिंदू” असुरक्षित कसे हा प्रश्न विचारणे सुद्धा आता “गैर हिंदू” मानले जाते, इथपर्यंत जनतेच्या एका हिश्श्याला अंधभक्त बनवले गेले आहे.
उत्तर प्रदेश मधील फॅशिस्ट योगी सरकार नंतर महाराष्ट्रातही भाजप आणि महायुतीचे सरकार बुलडोझर राज आणण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका अहवालानुसार ह्याच मालवण सिंधुदुर्गचे भाजपचे नेते नितेश राणे हे सर्वाधिक धार्मिक द्वेष पसरवणारी भाषणे करणाऱ्यांपैकी एक आहेत. पण प्रशासन आणि पोलिसांकडून त्यांच्या विरुद्ध कुठलीही कारवाई करण्याची तत्परता दिसत नाही जी त्यांनी या प्रवासी कष्टकरी कुटुंबियांविरुद्ध दाखवली. भाजप आणि आर.एस.एस. द्वारा राज्यसत्तेचे झालेल्या फॅशिस्टीकरणाचे हे उत्तम उदाहरण आहे.
त्यामुळे असे मुद्दे समोर येतात तेव्हा जनतेचा मोठा हिस्सा वास्तवाची शहानिशा न करता, आणि त्यानंतरही कायद्याच्या प्रक्रियेचा आग्रह न धरता “तडकफडक” कारवाईची मागणी करत लोकशाहीलाच सुळावर टांगण्याची प्रतिक्रिया देताना दिसतो.
आपण मेहनत करणाऱ्यांनी हे विसरता कामा नये की प्रशासनाला जर मनमर्जीने, कायद्याच्या प्रक्रियेशिवाय, भडकलेल्या भावनांच्या आधारावर कारवाईचा अधिकार असेल तर त्याची सर्वाधिक मोठी किंमत आपल्याला, म्हणजेच कामगार-कष्टकरी, झोपडीधारक, वस्त्यांचे रहिवासी, कामकरी यांनाच द्यावी लागेल कारण भांडवलदार, बिल्डर, उद्योजक, यांच्या हितांकरिता उद्या कोणत्याही बहाण्याने आपल्याही घरांवर कधीही बुलडोझर चालवला जाईल. पुण्यात चिंचवड जवळ कुडाळवाडी येथे नुकतेच 8 फेब्रुवारी 2025 रोजी “रोहिंग्या” मुस्लिमांचे निमित्त उभे करून हिंदू-मुस्लिम व सर्वजातीय कामगार-कष्टकऱ्यांची हजारो घरे अशीच पाडून प्रशासनाने बिल्डरांकरिता 827 एकर जमीन मोकळी करवली आहे आणि एक लाखावर लोकांना उध्वस्त केले आहे !
भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष या मालवणमधील कष्टकरी कुटुंबावर झालेल्या बुलडोझर कारवाईचा तीव्र निषेध करत आहे. या प्रकरणात कायद्याची प्रक्रिया धाब्यावर बसवून मनमर्जीने दडपशाही करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत आहे. तसेच या कारवाईतून त्या कुटुंबाच्या झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई केली पाहिजे अशी मागणी करत आहे. आम्ही मागणी करत आहोत की मढी येथील ग्रामपंचायतीचा ठराव बेकायदेशीर घोषित केला जावा.
भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) महाराष्ट्रातील कामगार कष्टकरी जनतेला संघ-भाजप यांच्या धर्मांधतेच्या आणि अंधराष्ट्रवादाच्या राजकारणाचे खरे चरित्र ओळखून त्याच्याशी संघर्ष करण्याचा आणि जाती धर्माच्या पलीकडे कामगार कष्टकऱ्यांची व्यापक एकता मजबूत करण्याचे आवाहन करत आहे.
इंकलाब जिंदाबाद!
