Uncategorized

घाटकोपर (मुंबई) मध्ये होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू : जबाबदार शिदे-फडणवीस-पवार सरकार !!

दि. 13/5/2024 रोजी अवकाळी पावसामुळे मुंबईतील अनेक भागात दुर्घटना झाल्याचे दिसून आले आहे. घाटकोपर भागात पंतनगर येथे अवकाळी पावसातील वादळी वाऱ्यांमुळे 120×120 चौरस फूट आकाराचे मोठे लोखंडी होर्डिंग जवळच असलेल्या पेट्रोल पंपावर कोसळले. ज्यात 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर 75 गंभीर जखमी झाले आहेत. सदरचे होर्डिंग हे राज्य रेल्वे पोलिसांच्या मालकीच्या जागेवर होते. तसेच मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांनी यासाठी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या जाहिरात कंपनीला महाविकास आघाडी सरकारच्या काळात होर्डिंग लावायला परवानगी दिली होती, असे उघड झाले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत संबंधित रेल्वे पोलिसांना हे अनधिकृतपणे होर्डिंग काढायचे आदेश दिले होते. तरी देखील यावर कोणतीच कारवाई केली गेली नाही. तरी देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेने यावर वेळीच कारवाई का केली नाही? तब्बल 21 वेळेस बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ह्याच होर्डिंगवर दंड आकारण्यात आला पण त्याला काढण्याचे काम केले गेले नाही. खबरदारी म्हणून मुंबई महानगर पालिकेने मुंबईतही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ शकते त्यासाठी मोठ्या होर्डिंगच्या मालकांकडून ‘स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट’ का मागवले नाहीत पालिकेकडून रेल्वे पोलिसांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करून देखील कोणतीही कारवाई का केली नाही? अशा घटना घडणारच मग यावर पालिका अधिकारी फक्त नोटिसा बजावून सोडणार का? असे अनेक प्रश्न घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर उभे राहिले आहेत.

अशात आज महायुती सरकार आणि महाविकास आघाडी एकमेकांवर चिखलफेक करत आपापली जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर सरकार कुठलही असो ते ठेकेदार, मालक आणि भांडवलदार वर्गाच्या हितासाठी, त्याच्या फायद्यासाठी सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून काम करत असते, ज्यात सामान्य जनता होरपळत आणि मरत असते. घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटना हे ह्याचेच उदाहरण आहे. दोन्ही सरकारांच्या अनागोंदी कारभारामुळे या घटनेची सर्वस्वी जबाबदारी राज्यसरकारची आहे.

जाहिराती आणि नफ्याच्या हव्यासापोटी भांडवली व्यवस्थेत सरकारी स्तरावर कामात होणारा दिरंगाईपणा अनेक वेळा सामान्य लोकांच्या जिवावर बेतत असतो अशीच ही घटना आहे. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष संबंधित घटनेत मृत्यू पडले पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत आहेत. तसेच राज्यातील शिदे-फडणवीस-पवार सरकारच्या अनागोंदी आणि बेजबाबदार कारभाराचा निषेध करत आहे.

आम्ही मागणी करत आहोत की,

1. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधित व्यवस्थापन, कंपनी, अधिकारी व ठेकेदार यांवर कठोर कारवाई करण्यात यावी!

2. संबंधित दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सर्व व्यक्तींच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये मोबदला देण्यात यावा!

3. सर्व अनधिकृत होर्डिंग हटवून ते लावणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी!