EducationFascism

शिक्षण संस्थांमध्ये फॅसिस्ट गुंडशाही नाही चालणार! विद्यापीठे लोकशाही युक्त, हिंसाचार मुक्त झालीच पाहिजेत !

2 फेब्रुवारी रोजी पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांची नाटक परिक्षा सुरू असताना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) या संघ परिवाराच्या गुंड विद्यार्थी संघटनेने नाटका दरम्यान हल्ला करून विद्यार्थ्यांना मारहाण केली, आणि प्राध्यापकांना शिवीगाळ केली. सदर परिक्षेमध्ये प्रहसन(विडंबन) या प्रकाराचे नाटक सुरू असताना, यामुळे धार्मिक भावना दुखावल्याची बतावणी करत हा हल्ला करण्यात आला आहे.

देशामध्ये धर्मावर टीका करण्याच्या स्वातंत्र्याचा दाखला कागदावर तरी कायदा देतो, आणि हे नाटक तर फक्त प्रहसनच होते. यानंतर तक्रार दाखल करण्यास गेलेल्या विद्यार्थ्यांवरच नव्हे तर खुद्द विभाग प्रमुखांवर सुद्धा गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत आणि विद्यापीठ प्रशासन बघ्याची भुमिका घेऊन बसले आहे. पुणे विद्यापीठामध्ये दहशतीचे वातावरण तयार करण्यात आले आहे, आणि शिक्षक-विद्यार्थी-कर्मचाऱ्यांमध्ये तोंड उघडाल तर तुमच्यासोबत सुद्धा हेच केले जाईल हा संदेश दिला जात आहे. संघ परिवाराच्या गुंड सेना, पोलिस, आणि विद्यापीठ प्रशासन यांची ही युती याचेच द्योतक आहे की विद्यापीठांमध्ये आणि एकंदरीत समाजातच नागरी-लोकशाही अधिकारांना संपुष्टात आणण्याच्या फॅशिस्ट योजनेचा हा भाग आहे.

२२ जानेवारी रोजीच एफ.टी.आय.आय. या फिल्म प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा राम मंदिर प्रश्नावरील राष्ट्रीय पारितोषिक विजेती “राम के नाम” ही फिल्म दाखवल्यावरून संघी गुंड शक्तींद्वारे विद्यापीठाच्या आवारात हल्ला करण्यात आला आणि इथेसुद्धा पीडीत विद्यार्थ्यांवरच गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत आणि संस्थेचे प्रशासन विद्यार्थ्यांना अजिबात साथ देताना दिसून आलेले नाहीये. हे स्पष्ट आहे की ही कॉलेजेस आज शिक्षणाचे नव्हे तर फॅशिस्ट प्रचाराचे अड्डे बनवण्याचे काम सुरू आहे.

गेल्या 9 वर्षात देशातील जनपक्षधर स्वरूपाच्या कोणत्याही विचारांचे, फॅशिझम विरोधी विद्यार्थी जेथेही सक्रिय आहेत, अशा जाधवपूर, आय आय टी मुंबई, जे एन यू, दिल्ली विद्यापीठ, जामिया, एच.सी.यू. अलिगढ, वर्धा, आणि अशा अनेक विद्यापीठांमध्ये सतत विद्यार्थ्यांना निशाणा बनवले गेले आहे.

एकीकडे रस्त्यांवर बजरंग दल, एबीव्हीपी, हिंदू जनजागृती सारख्या असंख्य संघटना खुलेआम जय श्रीरामचे नारे देत, मुस्लिम विरोधी विखारी भाषणे देत फिरत आहेत, आणि त्यांच्याकडे सरकारकडून फक्त दुर्लक्ष केले जात नाहीये तर त्यांना साथ दिली जात आहे, तर दुसरीकडे भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षासारख्या संघटना, भगतसिंह जनअधिकार यात्रेसारख्या यात्रा बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार सारखे मुद्दे घेऊन जनतेत जात असताना त्यांना “जय श्रीराम”चे नारे देत अडवले जात आहे.

याचे कारण आहे की भांडवलदार वर्गाची इमाने-एतबारे सेवा करून आणि त्यांच्या तुंबड्या भरून दुसरीकडे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराने देशातील सामान्य कामकरी जनतेचे कंबरडे मोडून टाकल्यानंतर, आता 2024 च्या निवडणुकांच्या तयारीसाठी देशभरात पुन्हा एकदा धार्मिक उन्माद पसरवण्याचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम भाजप-संघाने सुरू केले आहे. अशामध्ये ज्ञानाच्या हत्याराद्वारे विचार करू शकणाऱ्या विद्यार्थी आणि सुशिक्षित वर्गामध्ये दहशत निर्माण करू शकणाऱ्या शिक्षणसंस्थांना निशाणा बनवणे, आणि बोलू शकणारे सर्व आवाज दाबणे हाच यांचा अजेंडा आहे.

परंतु देशातील लोकशाही अधिकारांकरिता उभे राहणारे, न्यायप्रिय, क्रांतिकारी विद्यार्थी-युवक यांच्या धमक्यांना दबणार नाहीत आणि या गुंडशक्तींना पुरून उरतील असा आम्हाला निश्चित विश्वास आहे.

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) या हल्ल्यांची कठोर निंदा करत असताना सर्व विद्यापीठांमध्ये लोकशाही-नागरी अधिकार बहाल करण्यासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शिक्षणसंस्थांमधील सर्व न्यायप्रिय विद्यार्थी-शिक्षक-कर्मचारी यांना संघटित होण्याचे आणि फॅशिस्ट शक्तींविरोधात लढा उभारण्याचे आवाहन करत आहे.

फसिवाद का एक जवाब इंकलाब जिंदाबाद!