परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलीसी छळाचा आणि हत्येचा तीव्र निषेध!
फडणवीसांच्या नेतृत्वाखालील जातीयवादी भाजप-महायुती सरकार मुर्दाबाद!
भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सत्तेवर येऊन एक महिनाही उलटलेला नाही आणि जातीय द्वेषपूर्ण गुन्हे आणि हल्ले सुरु झाले आहेत. सोमनाथ सुर्यवंशी या 35 वर्षीय वकिलांना परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनात ताब्यात घेण्यात आले आणि त्यांचा इतका क्रूर छळ करण्यात आला की कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. संविधान विटंबनेच्या घटनेविरोधातील निदर्शनांनंतर त्यांना 50 इतरांसह ताब्यात घेण्यात आले, त्यांच्यावर अनेक गंभीर पोलिस खटले दाखल केले गेले, आणि पोलिसांनी प्रचंड छळ सुरु केला.
परभणीतील प्रियदर्शनी नगर आणि भीम नगर यांसारख्या दलित वस्त्यांमध्ये स्थानिक आणि राज्य राखीव पोलीस दल (SRPF) महिला आणि पुरुषांवर अत्याचार करत असल्याचे अनेक व्हिडिओ फिरत आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, कोठडीत असलेल्या सर्वांना अनेक जखमा आहेत आणि त्यांना वैद्यकीय उपचार न करता पोलिस कोठडीत आणि नंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. वैद्यकीय उपचारांना नकार, कोठडीतील छळ हे एक नृशंस जातीय वास्तव दाखवतात, जे स्थानिकांनी रेकॉर्ड केलेल्या अनेक व्हिडिओमध्ये दिसत आहे, ज्यात पोलीस जाणीवपूर्वक दलित झोपडपट्ट्यांमध्ये घुसून खाजगी मालमत्तेची नासधूस करताना दिसत आहेत.
परभणीचे विदयमान भाजप आमदार यांनी संघाच्या विचारधारेला धरुन, आणि पोलिसांचा बचाव करण्यासाठी सूर्यवंशी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे जाहीर केले. यापेक्षा लाजिरवाणी आणि भयंकर गोष्ट काय असू शकते? पण, हे आश्चर्यकारक नाही कारण पोलिसांची क्रूरता, जातीय अत्याचार, बलात्कार, लिंचिंग यांचे आरोपी आणि दंगलखोरांचा बचाव करताना सर्व रेकॉर्ड मोडण्यासाठी भाजप कुप्रसिद्ध आहे.
आठवा रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड, जिथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध केल्यानंतर दलितांना भडकवण्याचा एक छुपा प्रयत्न आणि त्यानंतर घाटकोपरमध्ये आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. परभणीत आंदोलनानंतर झालेल्या अशाच कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. अटकेपासून हल्लेखोरांच्या बचावाची अशी हमी, हीच आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या जातीयवादी दुर्गंधीला आणि अशा प्रकारच्या जातीयवादी हल्ल्यांना प्रोत्साहन देते.
भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील हत्येचा तीव्र शब्दात निषेध करत आहे, आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि पोलिस अधिकारी तसेच पुतळ्यावर जाणीवपूर्वक हल्ला करणारा दत्ता पवार यांच्यावर कठोर कारवाई करावी ही मागणी करत आहे.
कोठडीतील छळ, कार्यकत्यांचे अटकसत्र, फॅसिस्ट भाजपकडून जनतेच्या अधिकारांचे दमन, जनतेच्या विरोध करण्याच्या अधिकाराचे दमन, आणि वाढते जातीय अत्याचार यावर एकच उपाय आहे, आणि तो आहे जातीय अस्मितांच्या नव्हे तर कामकरी वर्गाच्या एकतेवर आधारित जनांदोलन.
सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा आणि जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे.
जातीवाद मुर्दाबाद! इन्कलाब झिंदाबाद !!
