अहिल्यानगर (अहमदनगर) – महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी फॅशिस्टांची नवी प्रयोगशाळा!
जात धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढ्याशी नाते जोडा!
आज देशभरात फॅशिस्ट विचारधारा धार्मिक द्वेष पसरवून समाजाला विभागण्याचे काम करत आहे. प्रत्येक राज्यात धार्मिक तणाव निर्माण करून फॅशिस्ट विचारांना बळकटी देण्यासाठी काही शहरं प्रयोगशाळा बनवली जात आहेत. त्यात महाराष्ट्रात सध्या अहिल्यानगर (अहमदनगर) हे शहर अशाच प्रयोगाचे केंद्र बनले आहे.
नगर जिल्ह्याला कामगार चळवळीचा प्रदीर्घ इतिहास आहे, आणि या शहराला सुद्धा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आणि प्रगतीशील विचारांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे. अहमदनगर येथे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली होती. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि फातिमाबाई शेख यांनी या शाळेला भेट देऊन तिथेच शिक्षणाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली. अशा समृद्ध सामाजिक परंपरेच्या भूमीत अगोदर जातीय अत्याचार आणि आता फॅशिस्ट विष पेरण्याचे षड्यंत्र हिंदुत्ववादी ताकतींनी सुरू केले आहे.
गेल्या काही महिन्यांत शहरात आणि जिल्ह्यात धार्मिक तणावाचे प्रमाण वाढले आहे. मढी ग्रामपंचायतीने जत्रेत मुस्लिमांना दुकाने लावण्यास बंदी घातली, शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाने केवळ हिंदू कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेत 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, तर शेवगाव येथे मशिदीवर दगडफेक करून दंगल भडकवली गेली. छोट्या वादांनाही आता धार्मिक रंग देण्यात येतोय, आणि त्यामागे हिंदुत्ववादी फॅशिस्ट शक्तींचा थेट हस्तक्षेप आहे.
नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि कालीचरण महाराज यांसारखे भाजप-आरएसएसशी निगडीत नेते द्वेषपूर्ण भाषणांतून समाजात तेढ निर्माण करत आहेत. आता या स्पर्धेत भाजप-संघापुढे आपले कर्तॄत्व सिद्धू करू पाहणारे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम धर्मीयांविरोधात विषारी वक्तव्यं सुरू केली आहेत. 28 सप्टेंबर 2025 रोजीच्या दुर्गामाता दौडीत “I Love Mohammad” अशी रांगोळी काढल्याने झालेल्या वादातून पोलिस लाठीचार्ज झाला, यानंतर आंबेडकर पुतळ्याजवळ आक्षेपार्ह चिठ्ठ्या सापडल्या, आणि दलित–मुस्लिम तणावाची नवीन लाट निर्माण करण्यात आली. त्यानंतर संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांनी भडकाऊ भाषणं करत मोर्चे काढले, तसेच जगताप यांनी दिवाळीच्या निमित्ताने “फक्त हिंदू दुकानांतून खरेदी करा” असे आवाहन करून समाजविभाजनाला खतपाणी घातले. मुस्लिमांच्या जगण्याच्या मूलभूत हक्कावर, जीविकोपार्जनाच्या हक्कावर हल्ला चढवण्याचे नवनवीन “प्रयोग” करण्याचे काम निवडून गेलेले लोकप्रतिनिधी करत आहेत आणि कायद्याला पायदळी तुडवत आहेत.
नगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असला तरी भांडवली विकासात मागे पडलेला आहे. पुणे आणि संभाजीनगरच्या (औरंगाबाद) तुलनेत येथे रोजगार, व्यवसाय आणि उच्च शिक्षणाच्या संधी अत्यल्प आहेत. स्थानिक नेत्यांनी ठेकेदार आणि बिल्डर लॉबीलाच पोसले आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बेरोजगारी, झोपडपट्ट्या, मूलभूत सुविधांचा अभाव आणि गुन्हेगारी वाढली आहे. वस्त्यांमध्ये आजही पिण्याचे पाणी, सांडपाणी सारख्या समस्या आ वासून उभ्या आहेत! या परिस्थितीत हिंदूत्ववादी फॅशिस्ट शक्ती तरुणांना द्वेषाच्या राजकारणात ओढून खऱ्या प्रश्नांना झाकत आहेत!
दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाजातही धर्मांध राजकारण वाढताना दिसत आहे. अनेक वर्षांपासून एआयएमआयएम सारखे पक्ष अहिल्यानगरमधील मुस्लिमात बहुल भागात पाय रोवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु लोकांनी त्यांना नाकारले होते. आता हिंदुत्ववादी नेत्यांच्या विषारी वक्तव्यांमुळे काही मुस्लिम तरुण प्रतिक्रियावादी धार्मिक राजकारणाच्या प्रभावाखाली जात आहेत. हे दोन्ही प्रवाह राजकारणाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत: समाजाला विभाजित ठेवून सत्ताधाऱ्यांचे अपयश झाकणारे राजकारण!
भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाच्या (RWPI) वतीने आम्ही अहिल्यानगर (अहमदनगर) मधील सर्वधर्मीय, सर्वजातीय कामगार, कष्टकरी आणि जनतेला आवाहन करतो, की या खोट्या धार्मिक द्वेषाच्या राजकारणाला नाकारा, धार्मिक आधारावर बाजारातील बहिष्काराला नाकारा, एकमेकांच्या उपजीविकेच्या हक्काच्या रक्षणात उभे रहा, आणि महागाई, शिक्षण, रोजगार, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या खऱ्या प्रश्नांभोवती संघटित व्हा!
🔸 भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI)🔸
संपर्क : 7499264646
