मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून मानखुर्द–गोवंडीतील एसएमएस कंपनी अर्थात बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लँट अजूनही सुरूच!
मानखुर्द–गोवंडीतील जनतेला अजून किती जीव गमवावे लागणार, केव्हा हा विषारी प्लँट अखेर बंद किंवा स्थलांतरित होणार?
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे जवाब दो! महायुती सरकार जवाब दो!
मानखुर्द–गोवंडी भागातील नागरिकांच्या आयुष्याशी थेट खेळ करत दमा, टीबी, अस्थमा, कॅन्सर, क्षयरोग, श्वसनाचे व त्वचेचे असंख्य आजार, पसरवणाऱ्या एसएमएस बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लँटला सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दोन वर्षांच्या आत स्थलांतर करण्याचा स्पष्ट आदेश दिला होता. हा प्लँट घनदाट लोकवस्तीपासून दूर औद्योगिक क्षेत्रात हलवावा, असे न्यायालयाने नमूद केले होते. 11 सप्टेंबर रोजी दोन वर्षांची मुदत संपूनही प्लँट आजही पूर्ण क्षमतेने सुरू असून मानखुर्द–गोवंडीच्या वातावरणात विषारी धूर पसरवत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने स्थलांतराचा आदेश दिला, याचा अर्थच असा की हा प्लँट विषारी वायू पसरवत असल्याचे पुरावे निर्विवाद आहेत. मग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) सातत्याने “प्रदूषणाची पातळी अनुमत मर्यादेत आहे” असे खोटे दावे का करते? हा उघड विरोधाभास MPCB आणि कंपनी व्यवस्थापन यांच्या संगनमताने तयार झालेल्या फसव्या अहवालांचेच द्योतक आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा एम–पूर्व विभाग म्हणजे मानखुर्द–गोवंडी हे मुंबईतील विषारी धूर, कचरा व घातक कारखाने ढकलण्याचे ठिकाण बनवले गेले आहे. 1950 पासून शहरभरातून झोपडपट्टीवासीयांना उचलून येथे जबरदस्तीने स्थलांतरित करण्यात आले. लल्लुभाई कंपाऊंड, नटवर पारेख कंपाऊंडसारख्या “उभ्या झोपडपट्ट्या” (vertical slums) उभारण्यात आल्या. आज इथे सिमेंट कारखाना, वेस्ट–टू–एनर्जी प्लँट, देवनार डम्पिंग ग्राउंड/लँडफिल आणि सर्वात घातक बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट उभा आहे.
अशा विषारी प्रकल्पांसाठी मुंबईतील विकासाच्या बाबतीत सर्वात मागासलेल्या मानखुर्द–गोवंडीचीच का निवडली जाते, याचे उत्तर स्पष्ट आहे, कारण येथे राहणारे लोक प्रामुख्याने कामगार वर्गीय, दलित, मुस्लिम बहुल आणि स्थलांतरित कामगार–कष्टकरी आहेत. त्यांचे जीवन आणि येथील जमीन दोन्ही पण सत्ताधारी व भांडवलदार वर्गासाठी “स्वस्त” व कवडीमोल झाले आहे.
अशात या भागातील परिस्थिती किती भीषण आहे? याचा अंदाज आपल्या यावरून येतो की, मानखुर्द–गोवंडीतील हवा PM2.5, PM10 आणि NO2 सारख्या घातक कणांनी नेहमीच प्रदूषित असते. 2014–2023 दरम्यान एम–पूर्व विभागातील बीएमसी दवाखान्यांमध्ये नोंदवलेल्या टीबी रुग्णांमध्ये तब्बल 295% वाढ झाली आहे. संपूर्ण मुंबईत हवा “मध्यम” (AQI 101–200) असताना मानखुर्द–गोवंडीची हवा सतत “अत्यंत खराब” (>300 AQI) श्रेणीत राहते. 2016 मधील अभ्यासानुसार, कंपनीच्या परिसरातील मातीत पाऱ्याचे प्रमाण अनुमत मर्यादेपेक्षा पाच पट अधिक होते, तर पाण्यात ते तब्बल 114 पट अधिक होते! शहराच्या केवळ 6% लोकसंख्या एम–पूर्व विभागात राहते; तरी दम्यामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 10% मृत्यू याच भागात होतात.
अशा परिस्थितीत प्रश्न अनिवार्यपणे उभा राहतो की, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही स्थलांतर का झाले नाही? पर्यावरणीय मंजुरी ही मोठ्या भांडवलदारांसाठी कधीच अडथळा ठरत नाही. मग प्रस्तापित राजकारण्यांशी घनिष्ट संबंध असलेल्या मालकाकडून एसएमएस कंपनी म्हणजे हा बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट चालवून मानखुर्द–गोवंडीतील लाखो नागरिकांच्या जीवाशी का खेळले जात आहे.
अशात स्पष्ट आहे की, मानखुर्द–गोवंडी मधील जनतेचा जोपर्यंत जनदबाव आणि संघटित जन आंदोलन उभे राहत नाही, तोपर्यंत हा विषारी प्लँट बंद होणार नाही.
आमची मागणी
1. राज्य सरकारने तात्काळ हा विषारी प्लँट तत्काळ बंद करून त्याचे स्थलांतर नागरी वस्तीपासून दूर औद्योगिक वसाहतीत करावे आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाद्वारे बायोमेडिकल कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावावी.
भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI)
संपर्क : 9619039793, 7057088323
