बबन सोपान ठोके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
बबन सोपान ठोके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाचे उमेदवार कॉम्रेड बबन सोपान ठोके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा साठे नगर (मानखुर्द, मुंबई) येथे संपन्न झाली. यावेळी भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाच्या म्हणजे RWPI च्या स्थापनेची भूमिका मांडताना कॉम्रेड नागेश धुर्वे यांनी मांडले की प्रस्थापित सर्व पक्ष हे भांडवलदार वर्गाच्या कोणत्या ना कोणत्या गटाचे प्रतिनिधित्व करतात आणि निवडणुकीमध्ये जात, धर्म,भाषा,प्रांत,अस्मिता, पैसा , दारू अशामाध्यमांचा वापर करून जनतेला भुलवण्याचे काम ते आजपर्यंत करत आलेले आहेत; परंतु आता भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाच्या स्वरूपात जनतेमध्ये एक खरा क्रांतिकारी कामगार वर्गीय पर्याय उपलब्ध आहे. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष भांडवलदार वर्गाच्या कुठल्याही हिश्याकडून एक पैसाही निधी घेत नाही आणि पूर्णपणे सामान्य कष्टकरी मेहनती जनतेच्या घामाच्या कमाईतून उभा राहिलेला पक्ष आहे. यानंतर आपले वक्तव्य मांडताना उमेदवार कॉम्रेड बबन ठोके यांनी सर्व इतर पक्ष आणि विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. त्यांनी मांडले की काँग्रेस,भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे , सपा, बसपा हे सर्व पक्ष हे बिल्डर, उद्योगपती, ठेकेदार आणि धनदांडग्यांचे पक्ष आहेत;त्यांचा निवडणूक निधी याच वर्गाकडून येतो आणि म्हणून ते निवडून आले की यांची सेवा करतात. भाजपने आपले सर्व वायदे मोडले आहेत मग ते 15 लाख रुपये देण्याचे असो, काळे धन परत आणणे असो, दरवर्षी 2 कोटी रोजगार असोत, किंवा पेट्रोल डिझेल गॅस स्वस्त करणे असो. म्हणूनच या फासिस्ट पक्षाचे निवडणूक मुद्दे आजही काय आहेत तर मंदिर, हिंदुत्व आणि पाकिस्तान. त्यांनी विचारले की मोदी आज नोटबंदी, जीएसटी सारख्या मुद्यांवर निवडणूक का लढवत नाहीयेत ? त्यांनी पुढे मांडले की फासिस्ट गुंडांच्या या टोळ्यांना पोसण्याचे आणि भांडवलदारांना मोकळे रान देऊन कष्टकऱ्यांचे शोषण करायचे काम तर काँग्रेस च्या 70 वर्षांच्या काळात झाले. राहुल गांधींच्या गरिबी हटाव सारख्या जुमल्यांना, आणि धर्मनिरपेक्ष मतांच्या विभागणी सारख्या भूलथापांना जनतेने आता बळी पडता कामा नये. त्यांनी मांडले की मानखुर्द, गोवंडी, साठे नगर भागातील जनतेचे सरासरी आयुर्मान फक्त 40 वर्षे आहे; याचे पहिले कारण आहे प्रदूषित हवा, पाणी , नाल्यांची गैरसोय, स्वच्छतेचा अभाव. परंतु यांचे खरे कारण आहे की याचे निर्णय घेण्याच्या जागी आपण करोडपती उमेदवार आणि भांडवलंदारांचे प्रतिनिधी निवडून देत आलो. कामगार कष्टकरी जनतेने आपले वर्गीय राजकारण मजबूत करत आता आपला भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष मजबूत केला पाहिजे. थापीच्या चिन्हांचे बटन दाबत मोठ्या बहुमताने निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध क्रांतिकारी गीत सादर केले. सूत्रसंचालन कॉम्रेड अनिल साठे यांनी केले.







