Democratic RightsUncategorizedनागरी आणि लोकशाही हक्क

महाराष्ट्रातील घोटाळ्यांनी भरलेल्या मनपा निवडणुकीत भाजपचा अपेक्षित मोठा विजय!

फॅशिस्ट हल्ल्याविरोधात कामगार वर्गाच्या जोमदार आंदोलनाला उभे करण्याचा लढा पुढे न्यावाच लागेल !
RWPI ची संमिश्र कामगिरी आणि धडे !
आजवरच्या निवडणुकांपैकी एका सर्वाधिक घोटाळ्यांनी भरलेल्या, महाराष्ट्रातील 2026 मनपा निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वातील अस्तव्यस्त महायुतीला अपेक्षेप्रमाणे मोठा विजय मिळाला आहे, आणि 29 पैकी 23 मनपात त्यांचे राज्य आले आहे. देशातील 2014 पासून घोटाळेबाज निवडणुकांचा इतिहास पाहता, हाच निकाल अपेक्षित होता, परंतु भाजपने या निवडणुकीतही जिंकण्याकरिता धोकेबाज डावपेचांचा निर्लज्जपणे वापर केला. मतदारसंघांच्या पुनर्रचेनेपासून, 4 सदस्यीय वार्ड रचना, मतदार याद्यांमध्ये फेरफार, इतर पक्षांच्या करियरवादी उमेदवारांची खरेदी, निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून विरोधी उमेदवारांचे अर्जच रद्द करवणे, 68 मतदारसंघांमध्ये पैसे किंवा धमक्यांचा वापर करून बिनविरोध (बिना निवडणूक) उमेदवार जिंकवून आणणे, पुसता येण्य़ासारख्या शाईचा वापर, दुबार मतदारांचा वापर, बातम्यांमध्ये समोर आल्याप्र्माअणे अनेक ठिकाणी ईव्हीएमशी छेडखानी, ही या घोटाळ्यांची फक्त काही उदाहरणे आहेत. या निवडणुकांनी अधिक प्रकर्षाने भांडवली राजकारणाचे संधीसाधू, बाजारी रूप अधिक प्रकर्षाने समोर आणले, आणि सर्व रंगांच्या-झेंड्यांच्या पक्षांनी निर्लज्जपणे कुठे युत्या केल्या तर कुठे विरोधात लढले. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अगोदरील आणि नंतरच्या युत्यांमध्ये भाजप-एम.आय.एम., भाजप-कॉंग्रेस, कॉंग्रेस-शिवसेना, कॉंग्रेस-मनसे, शिवसेना-मनसे, दोन्ही राष्ट्रवादी अशा युत्या झाल्या आणि या सर्व पक्षांची वैचारिक धोकेबाजी उघडी पाडली.
यातून हे सुद्धा दिसून येते की कोणत्याही प्रकारच्या लोकशाही आघाड्यांचे राजकारण, कामकरी जनतेला फॅशिझमविरोधी लढयत कुठेही नेणार नाही. या उदाहरणातून लोकशाही आघाडीच्या राजकारणचे वास्तव सुद्धा पुन्हा एकदा उघडे पडले आहे, पुन्हा एकदा कामगार वर्गाच्या नेतृत्वातील फॅशिझमविरोधी जन चळवळीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, आणि फॅशिस्ट हल्ल्याविरोधात कामगार वर्गाच्या जोमदार आंदोलनाला उभे करण्याचा लढा पुढे न्यावाच लागेल हे सुद्धा अधोरेखित झाले आहे.
RWPI ने, नेहमीप्रमाणे, या निवडणुका भांडवली निवडणुकांच्या मैदानात क्रांतिकारी हस्तक्षेपाच्या तत्त्वानुसार, पूर्णपणे कामकरी आणि न्यायप्रिय जनतेच्या आर्थिक पाठिंब्याने लढल्या. अभियान पूर्णपणे कामगारांच्या आणि युवक स्वयंसेवकांच्या मेहनतीच्या जोरावर चालवले गेले. सर्वत्र कामकरी जनतेने त्याला उत्सफूर्त प्रतिसाद दिला.
RWPI चे उमेदवार कॉम्रेड बबन ठोके यांना मुंबईतील वार्ड -141 मधून 133 मते मिळाली, कॉम्रेड प्रज्ञा प्रभुलकर यांना वार्ड-140 मधून 79 मते, कॉम्रेड अश्विनी खैरनार यांना पुण्यातील वार्ड 39(क) मधून 456 मते, आणि अहिल्यानगर(अहमदनगर) येथे कॉम्रेड अविनाश साठे यांना 1740 मते मिळाली (जी एकूण मतदानाच्या जवळपास 20 टक्के आहेत), आणि ते तिसऱ्या स्थानी राहिले. मुंबईतील कामगिरी अगोदरच कमी असलेल्या अपेक्षेपेक्षाही कमी राहिली. मुंबईतील निवडणुका सुरूवातीपासूनच धार्मिक आणि भाषिक मुद्यावर धृवीकृत झाल्या होत्या, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कामकरी जनतेमध्ये सुद्धा तीव्र विभागण्या, बेरजा-वजाबाक्यांची गणिते दिसून आली, आणि हेच एम.आय.एम., भाजप आणि शिवसेनेच्या विजयात दिसून येते. परिणामी, कामकरी जनतेचे आर्थिक आणि नैतिक समर्थन मिळूनही मतांमध्ये परिवर्तित झाल्याचे दिसून येते नाही. यातून जनतेमध्ये क्रांतिकारी विचारधारेची कमजोर पकड आणि अधिक निग्रहाने कामाची आवश्यकता दिसून येते. विधानसभा 2024 च्या तुलनेत पुण्यातील त्याच वार्डातील मतांच्या संख्येत दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येते. परंतु अहिल्यानगर(अहमदनगर)मधील लक्षणीय चांगल्या कामगिरीने अपेक्षा ओलांडल्या. वार्ड 5(ड) मधील जनतेचा पाठिंबा हा प्रामुख्याने पाणी, सांडपाणी, विजेसारख्या अनेक प्रश्नांवर लढलेल्या लढाया आणि मिळवलेले विजय, प्रदीर्घ काळातील क्रांतिकारी सुधार कार्य, उमेदवाराची जनतेत असलेली प्रतिष्ठा, याचा परिणाम तर होताच; परंतु भांडवली पक्षांद्वारे उमेदवारास गंभीर धमक्या आणि प्रलोभने (येथे सत्ताधारी राष्टवादीचे, जी भाजपची युनिट म्हणूनच काम करते, 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत), आणि मते विकत घेण्याकरिता पैशाचा वारेमाप वापर यासमोर ही कामगिरी अधिक प्रकर्षाने लक्षणीय ठरते. या निवडणुक निकालाने पुन्हा एकदा जनतेपर्यंत जाऊन जनतेच्या दैनंदिन संघर्षांमध्ये आणि निवडणुकीमध्ये प्रभाव पाडण्याकरिता नावीन्यपूर्ण पद्धती, आणि लोकचळवळींमध्ये अधिक पाय रोवून जमिनीवर काम करण्याची गरज अधोरेखित होते.
तथापि, आपण जाणतोच की निवडणुका येणार आणि जाणार्, परंतु कामगार व कामकरी वर्गाची खरी लढाई ही रस्त्यावरच आहे – सन्माननीय़ जीवनासाठीची, रोजगार-शिक्षण-आरोग्यासारख्या अनेक मूलभूत अधिकारांसाठीची, आणि भांडवलाच्या सत्तेविरोधात व विशेषत: फॅशिझामविरोधात लढण्याकरिता एका क्रांतिकारी सामाजिक चळवळीला उभे करण्याची ती लढाई आहे.
RWPI कामगार वर्गाला, कामकरी जनतेला संघटित करत या लढ्याला नव्या निर्धाराने पुढे नेण्यास कटिबद्ध आहे.
इंकलाब जिंदाबाद!