Civil RightsDemocratic Rightsनागरी आणि लोकशाही हक्क

प्रसिद्ध शायर फैज़ अहमद फैज़ यांची अमर नज़्म ‘हम देखेंगे, लाज़िम है कि हम देखेंगे’ च्या सादरीकरणामुळे भावना भडकावल्याचा फॅसिस्टांचा हास्यास्पद आणि उथळ आरोप !

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध !

दि. 13/05/2025 रोजी नागपूर येथे वीरा साथीदार स्मृती समन्वय समिती द्वारा आयोजित वीरा साथीदार स्मृती व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात प्रसिद्ध शायर फैज़ अहमद फैज़ यांची नज़्म ‘हम देखेंगे, लाज़िम है कि हम देखेंगे’ सादर करून भावना भडकवल्याचा अत्यंत मूर्खपणाचा हास्यास्पद आरोप ठेवत आंबेडकरी कार्यकर्ते आणि कोर्ट सिनेमातील अभिनेते वीरा साथीदार यांच्या पत्नी पुष्पा साथीदार आणि इतर दोन सहकारी कार्यकर्त्यांवर नागपूरमधील सीताबर्डी पोलिस ठाण्यात हिंदुत्ववादी फॅसिस्टांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फॅसिस्टांनी दाखल केलेल्या एफआयआर नुसार, ‘सब ताज उछाले जाएंगे, सब तख्त गिराए जाएंगे’ यांसारख्या ओळी आणि ‘तानाशाही दौर’ यांचा संदर्भ, भारत-पाक तणावाच्या काळात लोकांना भडकावण्याच्या उद्देशाने असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात पुष्पा साथीदार आणि दोन सहकारी कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम 152, 196, 353, 3(5) अशा गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भाजप सत्तेत आल्यानंतर गेल्या दशकभरात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी, दडपशाही आणि क्रूर दमन राजरोस सुरू असताना, फॅसिस्ट कार्यपद्धतीतून अचंबित करणारे फोल, विचित्र आणि हास्यास्पद नमुने दिवसागणिक समोर येत आहेत. विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विचारवंत, कामगार नेते, अल्पसंख्य व दलित यांच्यावर देशभरात रोजच खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे दिसून येते. दुसरीकडे हिंदुत्ववादी फॅसिस्ट गटातील पक्ष, संघटना आणि सरकार मधील आमदार, खासदार, नेते मंत्री अनेकांकडून रोज खुल्या मंचावरून महिला विरोधी, मुस्लिम विरोधी, दलित अल्पसंख्याक विरोधी, गरीब विरोधी विखारी विधाने केली जातात. तेव्हा मात्र यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. एखाद्या दुसऱ्या प्रकरणात कारवाई झाली तरी पोलिस प्रशासन आणि न्यायालये खुल्या पद्धतीने यांना संरक्षण देतांना दिसून येतात. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, फॅसिस्टांकडून प्रशासन, न्यायायले आणि इतर सर्वच “स्वतंत्र संस्था” ह्या आतून पोखरल्या गेल्या आहेत. ज्यामुळे प्रशासन, न्यायालये पण फक्त बघ्याची भूमिका घेत नाहीत तर सक्रियपणे फॅसिस्टांचे संरक्षण करतांना दिसून येतात.

हे करत असताना फॅसिस्ट भाजप आणि संघ परिवाराकडून विचित्र आणि हास्यास्पद तर्क दिले जातात आणि आय टी सेलच्या वापरातून, गोदी मीडीयात बातम्या आणून, खोट्या प्रचाराद्वारे जनतेत पसरवले जाते. पुढे ह्याच तर्काचा वापर करून न्यायालयांवर दबावही आणले जातात. वरील प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत देखील तर्क देण्यात आला आहे की, भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना एका पाकिस्तानी शायर असलेल्या फैज़ अहमद फैज़ यांची प्रसिद्ध नज़्म ‘हम देखेंगे, लाज़िम है कि हम देखेंगे’ ह्या नज़्मच्या ओळी भावना भडकावणाऱ्या आहेत. त्यामुळे वरील प्रमाणे गुन्ह्याचे स्वरूप ठरवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरे तर ही जगभरात प्रसिद्ध कविता आहे आणि दडपशाही करणाऱ्या सरकारांविरोधात सतत वापरली गेली आहे. भारतातही अनेक चळवळींनी ही कविता सतत वापरली आहे. ती अनेक महाविद्यालयीन अभ्यासक्रमांचा सुद्धा भाग राहिलेली आहे.

खरेतर अशा हास्यास्पद कारवाईवर नागपूर खंडपीठाने पोलिसांना फटकार लावली पाहिजे, परंतु आजच्या काळात न्यायालयांकडून अशी आशा करणे अवघडच आहे. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) अशा प्रकारच्या सर्वच दडपशाहीचा प्रखर विरोध करतो व प्रगतिशील, न्याय विवेकबुद्धी असलेल्या सर्वच नागरिकांना लोकशाही अधिकारांचे रक्षण करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करतो.

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) •

संपर्क :

बबन – 9619039793 (मुंबई)
परमेश्वर – 7798364729 (पुणे)
अविनाश – 7499264646 (अ, नगर)