Uncategorized

सिद्धार्थनगर झोपडपट्टीत नागरिक सुविधांच्या प्रश्नांवर सभेचे आयोजन मागील कामाचा आढावा व आगामी कार्ययोजनचे आयोजन!

दि. 29ऑक्टोबर रोजी सिद्धार्थनगर झोपडपट्टी, अहिल्यानगर येथे भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) यांच्या वतीने स्थानिक नागरिक सुविधांच्या प्रश्नांवर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत वस्तीतील चालू कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच स्थानिक समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

सभेचे प्रास्ताविक साथी अतुल यांनी केले. त्यांनी सांगितले की, गेल्या सात वर्षांपासून पक्ष जनतेच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील कार्यदिशा ठरवण्यासाठी या सभेचे आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आजच्या परिस्थितीत कामगार आणि कष्टकरी जनतेच्या स्वतंत्र राजकीय पक्षाची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यानंतर साथी अविनाश यांनी वस्तीतील कामांचा सविस्तर आढावा मांडला. सिद्धार्थनगर भागातील अनेक अनुदानित शाळा सरकारच्या मोफत शिक्षण हक्क कायद्याकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेत होत्या. या विरोधात संघर्ष उभारून अनेक मुलांना मोफत प्रवेश मिळवून देण्यात आला आणि त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले.

गेल्या 25वर्षांपासून वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या होती. काही भागात पाइपलाइन टाकण्यात आली होती, परंतु ती कार्यान्वित झाली नव्हती. या प्रश्नावर जवळपास दिड वर्षांचा संघर्ष करून अखेर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यश मिळाले.

गटार तुंबणे, पावसाचे पाणी घरात शिरणे आणि त्यामुळे आरोग्यविषयक अडचणी निर्माण होणे या समस्यांवर पालिकेसोबत जवळपास दहा महिन्यांचा संघर्ष झाला. परिणामी नवीन ड्रेनेज लाईन आणि काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे.

वीजपुरवठ्याच्या कमतरतेमुळे वस्तीतील नागरिक अंधारात किंवा कमी व्होल्टेजच्या प्रकाशात राहत होते. संघटनेने MSEB कडे निवेदन देऊन कमी खर्चात घरांमध्ये मीटर बसवण्याची मागणी केली व ती मान्य झाली. तसेच नवीन DP बसवण्याची मागणीही मंजूर झाली आहे.

सभे दरम्यान साथी अविनाश यानी पुढे सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत भांडवली पक्ष मग तो फॅसिस्ट भाजप असो, काँग्रेस, शिवसेना वा इतर कोणताही फक्त निवडणुकीपुरतेच राजकारण करतात. सत्तेत कोणताही पक्ष आला तरी कामगार आणि कष्टकरी जनतेची परिस्थिती जसंच्या तशीच राहते.

वस्तीतील नागरिकांनी चर्चेमध्ये उत्साहाने भाग घेतला आणि आपल्या समस्या मांडल्या. अखेरीस, या सर्व प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी आणि हक्क-अधिकारांसाठी संघर्ष उभारण्यासाठी जनतेच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पुढील कामांसाठी नागरिकांना पक्षाशी जोडून घेण्याचे आवाहन करण्यात आले.

🔸 भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) 🔸
संपर्क: 7499264646