महाराष्ट्रात महायुतीचा अपेक्षित मोठा विजय ! फॅशिझमला फक्त निवडणुकीच्या मार्गाने आव्हान देऊ पाहणाऱ्या उदारवाद्यांनी आत्मपरिक्षणाची गरज !
कामगार वर्गावरील हल्ले होणार तीव्र, दीर्घकालिक लढ्याची तयारी करा !
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या जोरावर पुन्हा हर्षवायू झालेल्या उदारवाद्यांच्या डोळ्यात महाराष्ट्र 2024 विधानसभा निवडणुकीच्या निकालाने पुन्हा एकदा झणझणीत अंजन घातले आहे. 288 पैकी 235 म्हणजे तीन चतुर्थांश पेक्षा जास्त जागा जिंकत, महायुतीचे सरकार बनत आहे. काँग्रेस-राकाँ-शिवसेनेला जवळपास 34 टक्के तर महायुतीला 48 टक्के मते मिळाली आहेत. मतांमध्ये तयार झालेली ही तफावत मोठी आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल तात्पुरते विचलन होते, आणि फॅशिझम ही एक दीर्घकालिक परिघटना आहे हे कटू सत्य आहे. मविआ जिंकणारच हा भ्रम पाळणाऱ्या उदारवाद्यांनी निवडणुकीच्याच नव्हे तर एकंदरीत भांडवली राजकारणाबद्दल सुद्धा पाळलेले भ्रम तपासण्याची गरज आहे.
महाराष्ट्रातील उदारवादी-पुरोगामी यावेळी सुद्धा एकमुखाने महाआघाडीच्या बाजूने उभेच राहिले नाहीत तर मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचाराची धुराही उचलली. भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या विरोधात (ज्याला ही महाविकास आघाडी फॅशिझम म्हणण्यास सुद्धा कचरते!) सर्वधर्मसमभावाच्या मांडणीचे राजकारण (हिंदुत्ववादी शिवसेना-उबाठा सहित!) उभे करण्याचा प्रयत्न पुन्हा फसलेला आहे.
कटेंगे तो बटेंगे सारखे नारे व त्याद्वारे केले गेलेले तत्कालीन ध्रुवीकरण, प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप, मतदार याद्यांचे फेरफार-धाकदपटशा सारख्या निवडणूक प्रक्रियेतील धांदली व संभाव्यतः ईव्हीएमद्वारे पुन्हा एकदा घडवलेला आंशिक घोटाळा, या सारख्या मुद्यांनी महायुतीला मदत केली आहे. परंतु ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही, तो आहे त्यांचा सतत राहिलेला आणि आता पुन्हा वाढलेला जनाधार.
महायुतीतील सर्वाधिक शक्तिशाली पक्ष आहे भाजप, ज्यामागे हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित संघ परिवाराची संपूर्ण कॅडर आधारित संरचना काम करताना दिसते. तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे तयार करून त्यामार्फत निवडणूकीतील मतदारांच्या पानवार याद्यांना मॅनेज करण्यापासून ते संभाव्यतः निवडणूक प्रक्रियेतील धांदल्यांना घडवण्यापर्यंत या यंत्रणेची शक्ती निश्चित आहे. अशी शक्ती मविआ किंवा तत्सम कोणत्याही पक्षाकडे ना आहे, ना असणार आहे. लोकसभा निवडणुकीत फक्त मोदी सरकारविरोधी असलेल्या प्रचंड मोठ्या लाटेला काही प्रमाणात वळवू शकल्यामुळेच मविआच्या जागा वाढल्या, ना की त्यांच्याकडे असलेल्या संघटन शक्तीच्या आणि विचारधारात्मक लढाईच्या आधारावर.
याच फॅशिस्ट संघटित शक्तिद्वारे निवडणुकांचे केलेले सूक्ष्म नियोजन (मायक्रो मॅनेजमेंट), त्यामुळेच एकीकडे हिंदुत्वाच्या आधारे ध्रुवीकरण करत असतानाच ओबीसी-मराठा वादातून आणि इतर मार्गांनी विविध जातसमुहांना चुचकारण्याचे प्रयोग, गेल्या अनेक वर्षात उभे केलेले लव्ह जिहाद, गोमाता, वक्फ बोर्डासारखे मुद्दे व त्याद्वारे भाजपने केलेले धार्मिक ध्रुवीकरण, आणि त्यात भर टाकायला लाडकी बहिणसारख्या वरवर कल्याणकारी वाटणाऱ्या (परंतु वास्तवात कल्याणाचे सुद्धा “मालकरण” करत मतदारांना अधिक बाजारी मानसिकतेचे बनवणाऱ्या) योजना व त्यांची प्रचारयंत्रणेद्वारे पाडलेली भुरळ व निर्माण केलेली “गमावण्याची भिती” ही सर्व कारणे भाजप, व महायुतीच्या मतांमध्ये मोठ्या वाढीस कारणीभूत आहेत. विविध पक्षांच्या, जातींच्या मतांच्या बेरजा-वजाबाक्यांवर आधारित आणि जुजबी कल्याणकारी योजनांचे राजकारण जेवढे मविआ करू शकते, तेवढेच किंवा जास्त भाजप करू शकते, आणि ते ही फॅशिस्ट जनाधार टिकवून. परंतु भाजपने जे हिंदुत्वाचे राजकारण व मुद्दे उभे केले आहेत, त्यावर हिंदु मतांना गमावण्याच्या भितीने वाजवलेली सर्वधर्मसमभावाची पिपाणी निष्प्रभावी राहील आणि दीर्घकाळात जनमानसाचे हिंदुत्वीकरण होत राहील हे सुद्धा स्पष्ट आहे.
भांडवली निवडणुका हा नेहमीच एक “इव्हेंट” असतो, प्रचार-प्रभाव-मते-बातम्यांसहित सर्व काही विकायची जत्रा असते, जिच्या उत्सवी रूपाद्वारे जनतेला खोटी स्वप्ने विकण्याचे तंत्र अनेक शतकांच्या अनुभवातून भांडवलदार वर्ग शिकला आहे. हे करण्याची, नॅरेटीव्ह सेट करण्याची, मोठी शक्ती नेहमीच त्या पक्षाची जास्त असते, ज्यामागे भांडवल जास्त उभे आहे, आणि आज भारतात तो पक्ष भाजपच आहे. उदारवाद्यांनी नव-उदारवादी धोरणांद्वारे भ्रष्टाचार-महागाईला वाढवण्यात केलेल्या योगदानाच्या विरोधाला आपल्याकडे वळवूनच फॅशिस्ट सत्तेत आलेत, आणि प्रतिक्रियावादी विचारांच्या आधारावर जनतेला सतत भरकटवण्याची शक्ती फॅशिस्टांचे कायमचे हत्यार राहील. आर्थिक संकटाच्या सावटापायी 2014 पासूनच बड्या भांडवलदार वर्गाने भाजप-संघ परिवाराच्या फॅशिस्ट गुंड शक्तिंमागे आपले आर्थिक व संघटित पाठबळ लावले आहे, ते याकरिताच की कामकरी जनतेच्या कष्टाची लूट अधिक तीव्र करता यावी.
तेव्हा हे समजणे गरजेचे आहे, भांडवलाची एका फॅशिस्ट संघटनेमागे उभी राहिलेली शक्ती निवडणुकांद्वारे त्यामुळेच हरवली जाऊ शकत नाही. निवडणूकांनंतरही घोडाबाजार, ईडी-सीबीआयची, न्यायपालिकेची, भिती, आर्थिक नाकेबंदीसारखे मार्ग, आणि सतत होणाऱ्या निवडणुकांमध्ये जनमताला फिरवण्याची खात्रीशीर शक्ती यामुळे भारतात फॅशिस्ट शक्ती निवडणुकीच्या राजकारणात सतत मोठे आव्हान बनूनच राहणार, आणि त्याहीपुढे जाऊन रस्त्यावरील संघटित गुंडशक्तिद्वारे त्या एक समांतर शक्तिही बनून राहणार. अशामध्ये संपूर्ण आशा निवडणूकीत कसेबसे जिंकण्यावर, स्वतःच सर्व विचारधारेची तथाकथित तत्त्वे गुंडाळून ठेवून जोडतोडीचे राजकारण करत शिवसेनेसारख्या पक्षासोबत युती करण्यावर, लावून बसलेल्या उदारवाद्यांना सतत अशा निराशेलाच तोंड द्यावे लागणार आहे.
फॅशिझम ही एक प्रतिक्रियावादी सामाजिक चळवळ, भांडवलदारांच्या पाठिंब्यावर पोसलेला एक हिंस्त्र कुत्रा आहे. त्याला उत्तर, त्यामुळेच, एक क्रांतिकारी कामगारवर्गीय विचारधारेवर, मार्क्सवादावर, आधारित चळवळच असू शकते. जागतिक व देशस्तरावरील दीर्घकालिक आथिक संकटाच्या काळात भांडवलदार वर्गाच्या कोणत्याही हिश्शाकडे आज ना फॅशिझमशी निर्णायकपणे लढण्याची शक्ती असू शकते, ना इच्छा. त्यामुळेच अशी कोणतीही चळवळ उभी करण्याची शक्ती आज भांडवलदारांच्या विश्वासू काँग्रेसकडे असू शकते ना राकाँकडे ना वंचित सारख्या अगोदरच भाजपच्या मांडीवर बसलेल्या पक्षाकडे. म्हणूनच राहुल गांधींसारख्या वा शरद पवारांसारख्या एखाद्या नेत्याच्या वरवरच्या दिखावी भाषणांपलिकडे आज या पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांच्या स्तरावर तथाकथित हिंदू मतांकरिता हिंदुत्वाच्या राजकारणाला मूकमान्यता देणे हेच व्यावहारिक तत्त्व असल्याचे दिसून येते.
फॅशिस्ट शक्तींचे पुन्हा राज्यात सत्तेत येणे निश्चितपणे कामगार वर्गाकरिता मोठे आव्हान उभे करणार आहे. कामगार अधिकार, लोकशाही-नागरी अधिकार यांवरील हल्ला, जनांदोलनांचे दमन, प्रगतीशील व क्रांतिकारी विचारांचे दमन आता पुन्हा जोमाने पुढे जाणार आहे. या विरोधात जनतेच्या शक्तीला संघटित करण्याकरिता, फॅशिझमशी खऱ्या अर्थाने लढण्याकरिता, प्रगतीशील युवक, विद्यार्थी, कार्यकर्ते यांनी मार्क्सवादाची कास धरल्याशिवाय आणि एका दीर्घकालिक लढ्याची पायाभरणी केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
इंकलाब जिंदाबाद!

