अँड. आदेश बनसोडे यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याविरुद्ध आयोजित धरणे आंदोलनाला भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) चा सक्रिय जाहीर पाठिंबा !
दि. 1/6/2024 रोजी पालघर, वसई मधील माणिकपूर पोलिस स्टेशनअंतर्गत पोलिसांनी फॅशिस्ट भाजप पिलावळीच्या दबावाखाली भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा) चे राज्य सचिव अँड. आदेश बनसोडे यांच्या विरोधात युट्युबर ध्रुव राठी यांनी अलीकडेच प्रसारित केलेला चर्चित ‘नरेंद्र मोदी फाइल्स – एक हुकूमशहा मानसिकता?’ (Narendra Modi Files, A DICTATOR Mentality?) हा व्हिडिओ एका व्हॉट्सअप ग्रुप मध्ये शेअर केल्याच्या कारणावरून भारतीय दंड संहितेच्या कलम 171 फ, 171 ग, 188, लोकप्रतिनिधी कायदा कलम 123 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उघडपणे मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असताना माणिकपूर पोलिसांनी याला “गुन्हा” मानत बेकायदेशीरपणे हा गुन्हा दाखला केला आहे. जामीन मिळाल्यानंतर देखील पोलिसांचा जाच थांबला नाही. पोलिस आता अँड. आदेश बनसोडे यांना स्वतःचा फोन जमा करायला लावत आहेत.
अँड. बनसोडेंच्या एका RTI अर्जाच्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे की त्यांच्यावर झालेली कारवाई ही मोठ्या प्रमाणात मेसेजेस पाठवल्या (बल्क मेसेजिंग) कारणाने म्हणजेच करण्यात आली आहे. एका व्हॉट्सअँप ग्रुप वर एक मेसेज पाठवणे हे कसे काय “बल्क मेसेजिंग” होते याचे उत्तर मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी दिले पाहिजे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) आयुक्तालयांतर्गत येत असलेल्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मागील जानेवारी महिन्यात मीरा रोड परिसरात हिंदुत्ववादी शक्तींकडून मुस्लिम समाजातील अनेक तरुणांना लक्ष्य करून त्यांच्या संपत्तीची नासधूस करण्यात आली, हिंसा पसरवण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा ह्याच पोलिसांनी अनेक प्रकरणांमध्ये तक्रार दाखल करण्यास नकार देऊन आपल्या जबादारीपासून हात वर केले होते. हिंसाचारातील अनेक पीडितांनी पोलिसांवर त्यांच्या तक्रारी हाताळतांना जातीय, धार्मिक पक्षपात केल्याचा आरोप केला होता.
माणिकपूर पोलिसांकडून करण्यात आलेल्या ह्या खोट्या, बेकायदेशीर गुन्ह्याच्या कारवाई निषेधार्थ व ह्या गुन्ह्याला विनाशर्त मागे घेण्यात यावा या मागणीसाठी वसई-विरार येथील पोलिस आयुक्तालयाच्या बाहेर सर्व पक्षीय बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. ज्यात भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाने देखील सक्रिय सहभाग घेतला.
मागील दहा वर्षांपासून भाजप सत्तेत आल्यानंतर विविध लोकाभिमुख लेखक, विचारवंत, कलाकार, पत्रकार, कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. वकील आदेश बनसोडे यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा याच साखळीतील लोकशाही अधिकाराच्या पोलिसी दमनाचा भाग आहे.
आम्ही भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष अँड. आदेश बनसोडे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करत पोलिसांकडून करण्यात आलेल्या या बेकायदेशीर गुन्ह्याच्या कारवाई विरोधातील संघर्षात सोबत असल्याची भूमिका जाहीर करत आहोत. तसेच अशा प्रकारच्या सर्व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील व लोकशाही अधिकाराच्या दमनाच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष स्वतःला कर्तव्यबद्ध मानतो. जेव्हा सरकारद्वारे सर्वच विरोधी आवाजांना गप्प करण्यासाठी हुकूमशाही, दमन यांचा वापर केला जातो तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका कामगार वर्गालाच बसत असतो. म्हणून कामगार वर्गाने अशा सर्व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाही अधिकारांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात लढा उभारला पाहिजे.
