आंतरराष्ट्रीय

बांग्लादेशातील क्रांतिकारी विद्यार्थी आणि कष्टकरी जनतेच्या संघर्षाला सलाम !

वेळोवेळी सिद्ध होत आहे कामगार वर्गाच्या नेतृत्वकारी पक्षाची गरज !

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी देश सोडला आणि लोकांनी त्यांचे महालासमान निवासस्थान, गणभवन ताब्यात घेतले! गेल्या काही आठवड्यांतील घटनांची परिणती लोकांनी सत्ताधारी अवामी लीगच्या सरकारला उलथून टाकण्यात झाली आहे.

बांग्लादेशी लाखो विद्यार्थी, सामान्य कष्टकरी आणि कामगार जनता बांग्लादेश आणि राजधानी ढाकाच्या रस्त्यांवर उतरले आणि त्यांनी राज्य यंत्रणेला पूर्णपणे पंगू बनवून टाकले, ज्याने शेख हसीनाच्या नेतृत्वाखालील भांडवलदार वर्गाच्या निरंकुश शासनापुढे सर्वात गंभीर आव्हान उभे केले. आता लष्कर सत्ता ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत आहे आणि त्याने सर्व विरोधी पक्षांना सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

जानेवारी 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत शेख हसीना पुन्हा निवडून आल्या होत्या. त्यांची 15 वर्षे चाललेली प्रदीर्घ सत्ता टिकवण्यासाठी या निवडणुकीत स्पष्टपणे हेराफेरी करण्यात आली होती. निवडणुकीदरम्यान अनेक प्रमुख विरोधी पक्षांचे नेते तुरुंगात होते आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पक्षाने (बीएनपी) निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. यात जेमतेम 40 टक्के लोकांनी मतदान केले होते.

बांग्लादेशातील तीव्र बेरोजगारीच्या विरोधात वाढणारा असंतोष (17 कोटी लोकसंख्येपैकी सुमारे 3 कोटी विद्यार्थी आणि तरुण बेरोजगार आहेत) कोटाविरोधी आंदोलनाच्या रुपात बाहेर पडला. जवळपास दशकभर सुरु असलेले हे आंदोलन जून 2024 मध्ये पुन्हा भडकले आणि विद्यार्थी व इतर कष्टकरी लोकांचे एक देशव्यापी आंदोलन बनले. हे आंदोलन दडपण्यासाठी हसीना सरकारने लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या, तुरुंग, ग्रेनेड, रबर बुलेट आणि गोळीबारासारख्या प्रचंड दडपशाहीचा अवलंब केला. शेकडो लोक मारले गेले. त्याचा परिणाम असा झाला की ही चळवळ आणखी मोठी झाली. ऑगस्टपर्यंत शेख हसीना यांचा राजीनामा ही आंदोलनाची प्रमुख मागणी बनली, ज्याची परिणती त्यांच्या देशातून पलायन करण्यात आणि आंदोलकांद्वारे गणभवन ताब्यात घेण्याने झाली.

या आंदोलनात सध्या विरोधी पक्ष बीएनपीची उपस्थिती प्रमुख आहे, परंतु बेरोजगारी, अन्यायकारक कोटा प्रणाली, कामाची परिस्थिती आणि निरंकुश शासनाविरुद्ध बंड करणाऱ्या विद्यार्थी, तरुण आणि कामगारांच्या स्वतंत्र प्रवाहाचाही त्यात समावेश आहे.

बांग्लादेश सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे आणि तो परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. परंतु नफेखोरांसाठी हे आकर्षक “व्यवसाय वातावरण” अत्यंत कठोर कामाच्या परिस्थितीमुळे आणि कामगारांच्या तीव्र शोषणामुळे शक्य झाले आहे. जगातील सर्वाधिक शोषित कामगारांमध्ये बांग्लादेशी कामगारांचा समावेश होतो. कामगार या संघर्षाचा भाग राहिले आहेत आणि शेख हसीना यांना सत्तेवरुन हटवण्यात यश मिळाल्यानंतर आजही ते मोठ्या संख्येने आंदोलनात सामील होत आहेत.

राजकीय अस्थिरतेचा वाढता धोका आणि क्रांतिकारी मागण्या पुढे येण्याची शक्यता लक्षात घेऊन सत्ताधारी संस्थांनी जनतेला शांत करण्यासाठी आणि थोडा अवकाश मिळवण्यासाठी पावले उचलने सुरु केले आहे. बांग्लादेशचे लष्करप्रमुख वकार-उज़-ज़मां यांनी काल जाहीर केले की ते अंतरिम सरकार स्थापन करण्यास आणि चालवण्यास तयार आहेत. वाढत्या जनक्षोभाला लक्षात घेत त्यांनी नागरिकांच्या हत्येची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे आणि प्रमुख विरोधी पक्षांचे आणि नागरी समाजाच्या सदस्यांचे एक अंतरिम सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे ज्यात अवामी लीगला सहभागी केल्या जाणार नाही. हे विसरता कामा नये की वकार-उज़-ज़मां हे शेख हसीनाचे जवळचे नातेवाईक आहेत !

शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला, जो त्यांच्या निरंकुश शासनाचा प्रमुख समर्थक राहिला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी त्यांची तात्काळ झालेली भेट बांग्लादेशच्या कारभारात भारताचा सत्ताधारी भांडवलदार वर्ग किती गुंतलेला आहे हे दाखवते. शेख हसीना यांनी लंडनमध्ये आश्रय घेण्याचे वृत्त अजिबात आश्चर्यकारक नाही कारण ते असे ठिकाण आहे जेथील सत्ताधारी संस्थांच्या जवळच्या वर्तुळात अवामी लीग आणि बीएनपी या दोन्ही पक्षांचे लोक उपस्थित आहेत. बीएनपी आणि अवामी लीग बांग्लादेशातील ‘परिस्थिती सामान्य’ करण्यासाठी (म्हणजे भांडवलदार वर्गाची जुलमी राजवट पुनर्स्थापित करण्यासाठी) कुठल्याही तहापर्यंत पोहोचले तर आश्चर्य वाटणार नाही.

सत्तापालट, लष्करी कब्जा, सरकार उलथून टाकणे, सत्ताधारी व्यक्तींच्या हत्या आणि आत्मसमर्पण हे बांग्लादेशासाठी काही नवीन नाही. बांग्लादेशचा स्वातंत्र्योत्तर इतिहास याचा साक्षीदार आहे. यावेळी फरक हा आहे की लोकांचा संताप अशा एका मागणीच्या भोवती केंद्रित आहे जी बांग्लादेशच्या सत्ताधारी भांडवलदार वर्गाविरुद्ध एक क्रांतिकारी मागणी म्हणजे सार्वत्रिक रोजगाराच्या मागणीत बदलण्याची क्षमता ठेवते.

याची पूर्ण शक्यता आहे की प्रमुख विरोधी पक्ष, बीएनपी, या उठावात आपल्या उपस्थितीचा उपयोग करुन सत्ता परिवर्तनाचे नेतृत्व करेल. यामुळे प्रत्यक्षात आणखी प्रतिगामी, इस्लामिक कट्टरतावादी सरकार निर्माण होण्याची आणि बांग्लादेशी लोकांच्या लोकशाही आणि नागरी हक्कांचा आणखी हास होण्याची शक्यता आहे. क्रांतिकारी पर्याय तयार नसल्यामुळे जगातील अनेक भागांमध्ये ही शक्यता आपण साकार होताना पाहिली आहे.

तथापि, बांग्लादेशातील क्रांतिकारी विद्यार्थी, तरुण, कामगार आणि सामान्य कष्टकरी जनता दीर्घकालीन क्रांतिकारी उलथापालथीला जन्म देतील आणि क्रांतिकारी कामगार वर्गाच्या राजकीय पर्यायाच्या निर्मितीकडे वाटचाल करतील अशी शक्यता आहे. अशा बातम्या येत आहेत की विद्यार्थी आणि कामगारांच्या मागण्या पुढे आणण्यासाठी आणि आंदोलन पुढे नेण्यासाठी त्यांच्या समित्या तयार केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांनी कामगारांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कापड कामगार आधीच संपात सामील होत आहेत.

जनतेचा उठाव आता इतका मोठा झाला आहे की पोलिस आणि लष्कर त्याला दाबण्यात असमर्थ आहेत आणि ते बाजूलाच उभे राहिलेले दिसते. लष्करी राजवट नव्हे तर ‘जनतेचे सरकार’ ही मागणी विद्यार्थ्यांमध्ये आधीच जोर धरत आहे. तथापि, विद्यार्थी चळवळीच्या काही भागांकडून उचलण्यात आलेल्या अपरिपक्व आणि प्रतिगामी मागण्यांवरुन (आयसीसीचा हस्तक्षेप, कॅम्पसचे अराजकीयीकरण) असे दिसून येते की हे अद्याप अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

अशा स्थितीत बांग्लादेशातील तथाकथित कम्युनिस्ट पक्षांकडून फारशी अपेक्षा करता येणार नाही, ज्यातील बहुतेक एकतर सुधारणावादी बनले आहेत आणि काही तर अवामी लीगच्या नेतृत्वाखालील सरकारचा भागसुद्धा होते किंवा लोकशाही क्रांतीच्या जुन्या कार्यक्रमावर अडकले आहेत.

इतिहासाने आपल्याला वेळोवेळी शिकवले आहे, ज्याची सर्वात अलीकडील उदाहरणे म्हणजे अरब उठाव आणि श्रीलंकेतील उलथापालथ हे होते, की, समाजाच्या क्रांतिकारी परिवर्तनाचा स्पष्ट कार्यक्रम असलेला कामगार वर्गाचा एक क्रांतिकारी नेतृत्वकारी पक्ष नसताना, असे सर्व व्यापक जनविद्रोह केवळ राज्यकर्ते बदलवतात, ते समाजात क्रांतिकारक बदल घडवून आणू शकत नाहीत. तथापि, जनतेच्या क्रांतिकारी ऊर्जेमध्ये क्रांतिकारी कामगार वर्गाच्या पक्षाला जन्म देण्याची क्षमता आणि बीजे दडलेली असतात आणि अशा शक्यतांची बीजे बांग्लादेशातील आंदोलनातही आहेत. इतिहास वेळोवेळी आपल्यासमोर कामगार वर्गाच्या अग्रदल पक्षाची गरज अधोरेखित करत आहे!

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) बांग्लादेशातील क्रांतिकारी विद्यार्थी आणि कष्टकरी जनतेसोबत आपली एकता जाहीर करत आहे. आम्ही या आंदोलनातील राजकीयदृष्ट्या जागरुक विद्यार्थ्यांना-कष्टकऱ्यांना आग्रह करतो की त्यांनी आपली शक्ती ताबडतोब कामगार वर्गाच्या राजकीय पर्यायाच्या निर्मितीमध्ये लावावी ज्यामुळे अंततः बांग्लादेशातील कामगार वर्गाचा एक अग्रगण्य पक्ष निर्माण होईल ज्याच्याजवळ समाजवादाचा खरा क्रांतिकारी कार्यक्रम असेल.