भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणांना उघड करत पुण्यातील अप्परमध्ये जाहीर सभा संपन्न
भारताच्या क्रांतिकारी कामगार पक्षाने ४ नोव्हेंबर रोजी पुण्यातील अप्पर सुप्पर बिबवेवाडी परिसरात ‘मोदी सरकारचे कामगार विरोधी धोरण’ या विषयावर एका जनसभेचे आयोजन केले होते. या सभेच्या मुख्य वक्त्या भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या शिवानी कौल होत्या. या सभेसाठी बिबवेवाडी परिसरातील विविध क्षेत्रांत काम करणारे कामगार, कष्टकरी आणि विद्यार्थी युवकांनी हजेरी लावली.
सभेची सुरुवात जनविरोधी फॅशिस्ट मोदी सरकारच्या आणि तिच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणा देऊन झाली. पक्षाचे समन्वयक परमेश्वर जाधव यांनी थोडक्यात देशातील आणि महाराष्ट्रातील आजच्या परिस्थितीबद्दल बोलत, या सभेचे महत्त्व आणि गरज जमलेल्यांना जाणवून दिली.
मुख्य वक्त्या शिवानी कौल यांनी आपल्या वक्तव्याच्या सुरुवातीलाच हे अधोरेखित केले की, गेल्या अकरा वर्षांपासून आपल्या देशात आणि महाराष्ट्रात, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रूपाने एक फॅशिस्ट ताकद सत्तेत आली आहे. आणि ती आल्यापासून या देशातील व राज्यातील कष्टकरी जनतेची लूट आणि हाल मोठ्या वेगाने वाढले आहेत. जनतेच्या डोळ्यांत “अच्छे दिन”ची धूळ फेकत खरंतर भाजप सरकारने सत्तेत आल्यापासूनच अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला, मित्तल सारख्या या देशातील श्रीमंत, धनदांडगे, भांडवलदारांच्याच हिताची धोरणे राबवण्याचे काम केले आहे. सत्तेत आल्या आल्या जे पहिले काम भाजप सरकारने केले, ते म्हणजे कामगारांच्या अधिकारांवर हल्ला. कामगार आणि कष्टकऱ्यांनी वर्षानुवर्षे भांडवलदार वर्गाच्या आणि त्यांच्या सरकारांविरुद्ध संघर्ष करून जे काही हक्क जिंकले होते, ते भाजप सरकारने 2020 पासूनच चार लेबर कोडच्या माध्यमातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. किमान मजुरीचा अधिकार असो, कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेचा अधिकार असो, संप करण्याचा अधिकार असो किंवा संघटित होण्याचा अधिकार असो, अशा प्रकारच्या सगळ्या अधिकारांवर या चार लेबर कोडद्वारे गदा आणत आहे. हे सगळे कशासाठी, तर निव्वळ श्रीमंत भांडवलदारांच्या नफ्याचे संरक्षण करण्यासाठी. महाराष्ट्रात फडणवीस सरकारने पण याच भांडवलदारांच्या सेवेत कामाचे तास बारा करण्याचा कायदा केला आहे. या कायद्याचे खरे उद्दिष्ट हे सामान्य कष्टकरी जनतेची पिळवणूक करून मालक, भांडवलदारांचा जास्तीत जास्त नफा सुनिश्चित करणे हाच आहे. आज कामगारांनी त्यांच्या हक्क आणि अधिकारांवर होणाऱ्या या हल्ल्याच्या विरोधात संघटित होऊन लढण्याचे आवाहन करताना शिवानी यांनी हेही बजावले की, कामगारांनी स्वतःला इतक्यापुरतेच मर्यादित ठेवणे पुरेसे नाही.
भाजपच्या गेल्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत सामान्य कष्टकरी जनतेच्या वाट्याला हालअपेष्टाच आली आहे, ही वस्तुस्थिती आहे. एका बाजूला कर्जमाफी, कवडीमोलाच्या किमतीवर जमीन, वीज, पाणी पुरवत देशातील भांडवलदार वर्गाची संपत्ती दिवसेंदिवस वाढत असताना, बहुसंख्य कष्टकरी जनतेच्या जीवनात महागाई, बेरोजगारी, दिवसेंदिवस महाग होत चाललेली शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था, स्त्रिया, दलित आणि मुस्लिम अल्पसंख्यांकांविरुद्ध अत्याचार या सर्वांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे जनतेमध्ये तितक्याच मोठ्या प्रमाणात असंतोषही निर्माण झाला आहे. पण हे फॅशिस्ट सरकार याच असंतोषाला घाबरून स्वतःविरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला चिरडण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारने नुकत्याच आणलेल्या जन सुरक्षा कायद्यांमागचे सत्य हेच आहे. श्रीमंत, धनदांडगे भांडवलदार यांच्यासाठी केल्या जाणाऱ्या जनतेच्या लुटीच्या आणि शोषणाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला सोयीस्कररित्या देशद्रोही किंवा “अर्बन/शहरी नक्षल” घोषित करून त्याला तुरुंगात डांबण्याचे सर्व प्रयोजन या कायद्याद्वारे केले आहे. देशभरात सगळीकडेच भाजप सरकारने याचसारखे काळे कायदे जसे की यूएपीए (UAPA), एनएसए (NSA), यांचा वापर करत हक्क आणि अधिकारांसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थी, पत्रकार, बुद्धिजीवी, ट्रेड युनियन नेते या सर्वांना तुरुंगात टाकले आहे. याचबरोबर ईव्हीएम (EVM) चा घोटाळा आणि मतांची चोरी करत भाजप सरकार आता जनतेच्या मर्यादित राजकीय अधिकारांवर सुद्धा हल्ला करत आहे. फॅशिस्ट सत्तेद्वारे होणाऱ्या याच दमनाच्या विरोधात कामगार कष्टकऱ्यांनी एकजूट होऊन लढण्याची गरज शिवानी यांनी सांगितली.
कष्टकरी जनतेपासून त्यांचा खरा शत्रू लपवण्यासाठी आणि त्यांच्या खऱ्या मुद्द्यांपासून भरकटवण्यासाठी फॅशिस्ट ताकदी सांप्रदायिक आणि अंधराष्ट्रवादाच्या राजकारणाचा वापर करत असल्याचेही त्यांनी सांगितले. गोरक्षा, लव्ह जिहाद, मंदिर-मस्जिद सारख्या खोट्या मुद्द्यांचा प्रचार करून भाजप आणि RSS यांनी मुसलमानांच्या रूपात एक खोटा शत्रू उभा केला आहे. स्वातंत्र्य लढ्यात काहीही योगदान नसलेल्या आणि त्याउलट साम्राज्यवादी इंग्रजांचीच हातमिळवणी करून काम करणारी RSS आज देशभक्तीच्या खोट्या बोंबा मारत आहे आणि ज्या भांडवलदारांची ते खऱ्या अर्थाने सेवा करतात त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येक माणसाला ते देशद्रोही घोषित करत आहेत. आज कामगारांनी यांचे खरी चरित्र ओळखून सांप्रदायिक आणि अंधराष्ट्रवादाच्या राजकारणाला परतवून लावणे गरजेचे आहे.
कष्टकरी जनतेची खरी शत्रू, शोषण आणि अन्यायावर आधारित असलेली ही भांडवली व्यवस्था आहे. आणि त्याच भांडवली व्यवस्थेचे सर्वात नग्न आणि क्रूर रूप म्हणजेच फॅसिझम आहे. हाच फॅसिझम आज कष्टकरी जनतेचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि त्या विरोधात कामगार-कष्टकऱ्यांना संघटित होऊन लढण्याशिवाय पर्याय नाही. जनतेच्या असंतोषातून उठत असलेले विविध लढे यांना योग्य दिशा, कामगारांच्या योग्य राजकारणावर आधारित असलेला कामगारांचा स्वतःचा क्रांतिकारी पक्षच देऊ शकतो. अशा एका पक्षाच्या नेतृत्वातच कष्टकरी जनता फॅसिझमला निर्णायकरीत्या मात देऊ शकते आणि ही व्यवस्था बदलू शकते, हे शिवानी यांनी अधोरेखित केले.
सभेचा शेवट जमलेल्या कामगारांच्या निर्धार, जोशपूर्ण आणि आशेने भरलेल्या घोषणांनी झाला.
