Industrial AccidentLabour CodesNeoliberalismऔद्योगिक अपघातकामगार हक्कनवउदारवाद

अजून एक औद्योगिक अपघात ! अपघात नाही, नफ्याकरिता केलेले खूनच !

कामगारांचे जीव घेतच अस्तित्वात आहे भांडवली व्यवस्था !!

आज दुपारी 2 च्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जण जखमी झाले आहेत. हा स्फोट एवढा मोठा होता आजूबाजूच्या 2-3 किलोमीटरच्या भागात हादरे जाणवले, घरांतील खिडकीच्या काचा फुटल्या. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

असाच अपघात, सात दिवसांपूर्वी हरयाणाच्या सोनपत येथील फॅक्टरीत झाला होता ज्यात बॉयलर ब्लास्ट होऊन 2 कामगारांचा मुत्यू आणि 25 कामगार जखमी झाले होते. बहुसंख्य अपघात हे मालकांच्या, किंवा उच्च-अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे, नफ्यासाठी सुरक्षा यंत्रणा कमजोर ठेवण्याचे परिणाम आहेत! अशा औद्योगिक अपघातांमध्ये कामगारांच्या हत्यांचे सत्र चालूच आहे आणि नफेखोर, बेजबाबदार उद्योग नफ्याच्या वाढत्या लालसेने कामगारांचे जीवांची किंमत देऊन प्रकल्प चालवत आहेत !

आपल्या देशात, औद्योगिक अपघातात दरवर्षी हजारो लोक मारले जातात आणि अक्षम होतात. कामगार मंत्रालयाच्या अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत कारखाने, खाणी आणि बांधकामात झालेल्या अपघातात 6500 कामगारांना जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी 80 टक्के अपघात कारखान्यांमध्ये झाले आहेत. सरकारी आकडे सांगतात कि आपल्या देशात कारखान्यांमध्ये दररोज सरासरी तीन कामगारांचा मृत्यू मूलभूत सुरक्षा उपायांच्या अभावामुळे होतो.

मोदी सरकारने आणलेल्या नवीन श्रम कायद्यानंतर फॅक्टरीमध्ये सुरक्षा उपकरणाचा आभाव, कामगारांना अपुरे ट्रेनिंग आणि तपासणीसाठी कोणतीही यंत्रणा नाही हि एक सामान्य बाब बनली आहे. यापूर्वी, कामगारांची संख्या कितीही असो, सर्व कंपन्यांना सुरक्षा समिती स्थापन करणे बंधनकारक होते. मात्र, नव्या श्रम कायद्यानुसार सरकारी आदेश किंवा अधिसूचनेनंतरच सुरक्षा समितीची स्थापना करायची आहे. कंपन्यांसाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने कामाच्या ठिकाणी तपासणीसाठी प्रोटोकॉल देखील बदलले आहेत. फॅक्टरी ईन्स्पेक्टर चे पदच संपवून टाकले गेले आहे. कामगारांना तक्रार करण्यासाठी काहीच माध्यम उरले नाही. आकडेवारी सांगते की 2020 मध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टरसाठी 1,040 मंजूर पदांपैकी फक्त 69% भरली गेली. म्हणजे 412 कार्यरत कारखान्यांसाठी एक कारखाना निरीक्षक. यावरूनच सरकारला कामगारांची किती काळजी आहे हे समजू शकते.

भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष कामगार वर्गाला आवाहन करत आहे की कामाच्या जागी सुरक्षिततेकरिता सशक्त चळवळ उभी करत, मागणी करावी की जलदगती न्यायालयांद्वारे या आणि अशा सर्व औद्योगिक अपघातांची सुनावणी केली जावी आणि दोषींना कडक शिक्षा केली जावी !

आम्ही मागणी करत आहोत की,

1. फॅक्ट्रीच्या मालकाला अटक करून चौकशी करावी

2. संबंधित दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सर्व व्यक्तींच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये मोबदला देण्यात यावा!

3. MIDC अंतर्गत येणाऱ्या सर्व फॅक्टरीमध्ये सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे कि नाही हे तपासून नसेल तर फॅक्टरी मालकावर त्वरित कारवाई करण्यात यावी

4. कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा देण्यासाठी नवीन श्रम कायद्यात श्यक्य ते बदल करण्यात यावेत.